Thursday, December 8, 2011

आनंदानुभव


                            आनंदानुभव

दहावीच्या सुट्ट्यांमधे मी आनंदवनाला गेलो होतो. असाच एकटा. नुकतीच दहावीची परीक्षा झालेली. साधना आमटेंच समिधा हे पुस्तक वाचनात आलं आणि मी त्यांना पत्र पाठवलं. तर प्रत्यक्ष साधनाताईंच पत्रोत्तर आलं. भेटायला आणि आनंदवन पाहायला ये म्हणून. तसाच निघालो. मनात आनंदवनाबद्दलच्या खूप सार्‍या कल्पना घेऊन.  
आनंदवनाच्या गेट मधून आत प्रवेश केला की उजव्या बाजूला काही अंतरावर एक मोठी ड्रेसिंग रूम आहे. तिथे कुष्ठरूग्णांच्या जखमांना रोज ड्रेसिंग केल्या जातं. तिथे जाऊन पोहचलो. त्या वेळी बायोलॉजीची आणि डॉक्टरी पेशाची मनस्वी चीड होती. ऑपरेशन सारख्या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत असं उगाच वाटायचं. या सग़ळ्याबद्दल काहीशी भितीदेखील वाटायची. ड्रेसिंग रूम पाहिल्यावर ते सगळं आठवलं. ही भिती घालवायची तर ते सगळं करून बघणं भाग होतं. म्हणून मग ड्रेसिंग कसं करतात ते पाहायचं आणि जमलं तर प्रत्यक्षात स्वतः करून पाहायचं असं ठरवलं. दूसर्‍या दिवशी सकाळीच क्लिनिकला गेलो.
माझ्या आधी मोना नावाची एक वर्ध्याची मूलगी अनेक दिवसांपासून स्वतःहून तिथे ड्रेसिंगचं काम करायची. तिची सोबत होती. तिने थोडा धीर देखील दिला होता.

ती रूम बर्‍यापैकी मोठी. चार खाटा ठेवलेल्या. आणि बॅंडेजच सामान. 
आयोडीनचा वास.टिपिकल हॉस्पिटलच वातावरण.
बॅंडेज करायला चार जणं आणि गरज असल्यास इंजेक्शन द्यायला अजून एक. असे पाच जण मिळून आठ नऊशे लोकांचं बॅंडेज करायचे.
सकाळी 6 वाजता काम सुरू व्हायचं. सगळ्या पेशंटना बॅंडेज करून आपापल्या कामाला जायचं असायचं.म्हणून सकाळी तिथे कायम गर्दी आणि घाई असायची.
सगळ्यांनाच कामाला जायची लगबग.  
पहिल्या दिवशी सगळं फक्त पाहात होतो.आधिची पट्टी सोडणं, औषध लाऊन जखम धूवून त्यावर पट्टी लावणं. पिवळी आणि पांढरी असे पट्ट्यांचे दोन प्रकार. ज्यांची जखम अजून ओली असेल अशांसाठी पिवळी तर इतरांसाठी पांढरी पट्टी. अनेक जखमा. आणि त्यावर रोज केल्या जाणारं बॅंडेज. काम करायचं असेल तर चालणं आलचं. आणि त्यासाठी रोज पट्ट्या बदलणं देखील.
बहूतेक सगळी म्हातारी नाहीतर चाळीशी पार केलेली माणसं. बर्‍याच वर्षांपासून आनंदवनात असणारी. तिथेच काही ना काही काम करणारी.

पट्ट्या बांधणं वाटलं तेवढं सोपं नव्हतं. प्रत्येक पेशंटची पट्टी बांधायची विशीष्ट पद्धत असायची. वर्षानुवर्ष पट्टी बांधून तयार झालेली. झडलेल्या बोटांनुसार, ते जे काम करतात त्या कामाच्या स्वरूपानुसार ठरलेली. शेतात काम करणार्‍या म्हातार्‍या एक जादा पट्टी सोबत ठेवत. प्रत्येकजण आदल्या दिवशीची स्वतःची पट्टी सोबत घेऊन बसायचा.

पट्ट्या बांधून घेताना त्यांना कसल्या वेदना होत नसत. कारण कुष्ठरूग्णाला त्या भागात संवेदना नसतात. बंडेज गुंडाळताना, ती पांढरी पट्टी घट्ट आवळून बांधावी लागायची. आधी खूप सारा मेडिकेटेड कापूस पायाभोवती गुंडाळायचा आणि मग पट्टी बांधायची. अशी घट्ट बांधली की दिवसभर काम करताना ती निसटत नसे.
दूसर्‍या दिवशी मी पट्टी बांधायला घेतली. आदल्या दिवशी जखमा पाहून नजर मेली होती. नीट व्यवस्थित, जरा जास्तच वेळ घेऊन पहिली पट्टी बांधली.आपणही हे काम करू शकतो हा विश्वास आला.
     कधी कधी जखमेतून छोटे दगड, काचेचे तुकडे असं बरचं काही काढावं लागायचं. शेतात काम करताना पट्ट्यांमधून हे सगळं त्या जखमेत जाऊन बसायचं.   
मी नवीन आहे, अजून शिकतोय हे कळाल्यावर तिथल्या म्हातार्‍या पट्टी बांधताना धीर द्यायच्या. त्यांना पट्टी कशी बांधून हवी असेल ते स्वतःहून सांगायच्या. चूकलं तर ओरडायच्या. नीट जमल्यावर मनापासून शाबासकी द्यायच्या.
मी आणि मोना सोडून ड्रेसिंग करणारे बाकी सगळे कुष्ठरूग्णच होते. ट्रिटमेंट घेऊन बरे झालेले.

सकाळी 6 ते 9 प्रचंड काम. गडबड आणि धांदल. 9 नंतर मात्र म्हातारे कोतारे, कामाला न जाऊ शकणारे पेशंट यायचे. सगळं आवरायला 11 वाजायचे.
ती ड्रेसिंग रूम म्हणजे गडबड, गोंधळ आणि आनंदाचा नुसता कल्लोळ असायचा. ड्रेसिंग करणारं कुणी आलं नसेल तर त्याची चौकशी व्हायची. एकमेकांची थट्टा करत आणि हसतखेळत सगळं काम चालायचं.
रोज काम करून कामात सफाई येऊ लागली. 10-12 दिवस काम केल्यानंतर तर कुणाला कशी पट्टी लागते हे पाठच झालं होतं. पट्टी नीट जमली तर त्या प्रेमळ म्हातार्‍या खूपच कौतूक करायच्या..आशिर्वाद द्यायच्या.

सुरूवातीला वाटायचं, काय ह्या त्यांच्या वेदना..किती हा त्यांना त्रास..रोज पट्टी बदलायची. जखम झाली तर ती चिघळायची. मग काही दिवस काम बंद. असं बरच काही.
पुस्तकातून वाचून डोक्यात बसलेलं दुःख मी त्यांच्यात शोधायला जायचो. पण ही मंडळी तर भलतीच आनंदी असायची. कसलं दुःख आणि कसलं काय? जे झालयं ते मान्य करून जगायची.
प्रत्यक्षात दुःख होतं,वेदना देखील होती. पण या लोकांनी ती खूप सौम्य करून टाकली होती.
एकदा तर एक पेशंट आले होते. बरेच म्हातारे होते. त्यांच्या डाव्या पायाचा अर्धा अंगठा उंदराने रात्रीतून कुरतडून खाऊन टाकला होता.. संवेदना नसल्याने रात्री त्यांच्या लक्षात आलं नाही. सकाळी ऊठून पाहतात तर अंथरूणात सगळं रक्तं. त्यांचं ड्रेसिंग करताना खूप भरून येत होतं.

4-5 दिवसात बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली की जालन्याहून आलेला मूलगा रोज ड्रेसिंग करतोय. त्यांनी मुद्दाम भेटायला बोलावलं. तोपर्यंत त्यांची भेट झालीच नव्हती. आनंदवनाचा सगळा परीसरच एवढा मोठा होता की तो पाहताना सगळा दिवस निघून जायचा. आणि त्यांना भेटायला जायचं दडपणचं यायचं. आपण काही काम करत नाही, तर पहिल्याच दिवशी जाऊन त्यांना कसं भेटायचं अशी काहीशी भावना मनात होती.
मग मी त्यांना भेटायला गेलो. खूप वेळ बोलत होते..काय बोलत होते ते आता फारसं आठवत नाही कारण मी खूप भारावून गेलो होतो. केवढा मोठा माणूस.. काही सुचतच नव्हतं त्या वेळेस.
बाबा त्यावेळेस रोज पहाटे स्ट्रेचरवरून फिरायला जायचे. मला म्हणाले,तूही रोज येत जा. तिथून पुढे आनंदवनात होतो तोपर्यंत मी रोज पहाटे त्यांच्यासोबत फिरायला जायचो. तो अर्धा पाऊन तास भलताच भन्नाट असायचा. पावसाळी वातावरण, पहाटेची वेळ आणि त्यात बाबांसोबत त्यांचं बोलणं ऐकत फिरणं. सगळच स्वप्नवत.

          विचारांपेक्षा कृती महत्वाची असते वगैरे भानगडी तेंव्हा कळायच्या
नाहीत. आपण काहीतरी करायला हवं एवढीच भावना होती. अजूनही तीच भावना आहे.
11 वाजता ड्रेसिंगचं काम झालं की जनरल वॉर्ड मधे चक्कर टाकून यायचो.तो तर सिरीअस पेशंट्सने भरलेला असायचा. सोबत पोळ काका असायचे. ते बर्‍याच वर्षांपासून तिथलं हॉस्पिटलचं काम पाहायचे. इथले पेशंट कंटेजिअस लेप्रसीचे असल्याने सगळी काळजी घेऊन तिथे जायचो.
इलाज सुरू असल्याने डॉक्टर आणि नर्स सोडून त्यांना फारसं कुणी भेटायला यायचं नाही.त्यामूळे आम्ही गेलो की तिथल्या पेशंटना खूप बरं वाटायचं.आम्ही येण्याची वाट बघायचे. त्यांची विचारपूस करायला, दोन शब्द बोलायला ना घरचे असायचे, ना कोणी जवळचे. आम्ही भेटल्यावर खूप भरभरून बोलायचे. स्वतःच दुःखं सांगायचे.   

कुष्ठरोगासारख्या भीषण रोगाशी लढणारी ही माणसं. आता आनंदी असली तरी खूप काही सोसलेली. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर घरच्यांनी आणि गावातल्या लोकांनी झिडकारलेली. त्यांची वेदना सारखी असल्याने सगळी एकमेकांना धरून राहायची, सांभाळायची.
      बाबा त्यांच्या झडलेल्या बोटांकडे पाहून त्यांना जीवंत मानवी शिल्प   म्हणतात. तेंव्हा त्याचा अर्थ कळायचा नाही, पण आता कळतो.
 आनंदवनात गेलो होतो तेंव्हा वैचारीक गुंत्यात फारसा पडलोच नव्हतो. आपण काहीतरी वेगळं करत आहोत असंही तेंव्हा वाटलं नव्हतं. सेवेचं सामर्थ्य मला बाबांच्या आनंदवनात शिकायला मिळालं. मला ते खूप भावलं. जवळचं वाटलं. त्या नकळत्या वयात तिथल्या कुष्ठरूग्णांशी मी जोडल्या गेलो.
 या अनुभवाने खूप काही दिलयं. शब्दांच्या पलीकडचं..




-          सागर जोशी,
   पुणे. 



No comments:

Post a Comment