Wednesday, December 28, 2011

पहिला वहिला मोर्चा.


काही दिवसांपूर्वी आम्ही एका मोर्चात भाग घेतला.छ्त्तीसगड शासनाने त्याच्या निषेध करण्यासठी दर सोमवारी रायपूर ला सत्त्याग्रह करण्यात येतो.6 एप्रिल च्या सत्त्याग्रहात भाग घेण्यासाठी पुण्यातून एक तुकडी जाणार होती.त्यानिमित्त्याने रॅली आणि जाहीर सभा होती.आमचा मोर्चा हा त्याचाच एक भाग होता.

संध्याकाळी 5 वजता रॅलीला सुरूवात झाली होती.त्या आधी आम्ही सगळे मुक्ता च्या घरी जमलो.आणि आम्ही लक्ष्मी रोड वर रॅली गाठली.ऊन बरच होतं.तरी रॅली मधे सत्तर ते ऐंशी लोकं होते.आम्ही देखिल चालायला आणि घोषणा द्यायला सुरूवात केली. आपण काहीतरी वेगळं आणि भन्नाट करतोय असं सारखं वाटत होतं. नुकताच ‘हजारो ख्वाहीशे ऐसी’पाहिला होता..त्याचा प्रभाव अजून कायम होता.त्यात सिद्धार्थ ची भूमिका करणारा के के मेनन असाच मोर्चात भाग घेऊन स्वतःला अटक करून घेतो.शाळेत असताना आम्ही प्रभात फेरीत जायचो.त्यानंतर कुठल्याच रॅलीत भाग घेतला नव्हता.त्यामूळे या मोर्चाबद्दल खूप एक्साईटमेंट होती.

आजपर्यंत अशा निदर्शनांबद्दल केवळ ऐकून आणि वाचून माहिती होती.प्रत्यक्ष मोर्चात भाग घेण्याचा अनुभव खरच वेगळा.सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळून आहेत याची सतत जाणीव होत असते.रस्त्यावरचे लोक बॅनरकडे,पाट्यांकडे,त्यावरील मजकूराकडे पाहात असतात.एवढ्या ऊन्हात आरडाओरडा करत, घोषणा देत फिरण्यामागचं कारण काय आहे हे कुतूहलाने आणि गमतीने पाहात असतात.

’’लोकशाही जिंदाबाद,
हुकूमशागही मुर्दाबाद’’

म्हणत आम्ही मोठमोठ्याने घोषणा देत होतो.प्रत्येक चौकात ट्राफिक पोलीस तत्परतेने पुढे होऊन लोकांना अडवत होटल आणि मोर्चाला वाट करून देत होते.आमच्या हातातल्या पाट्या वाचून विषय समजून घेत होते.अनोळखी लोकांकडे पाहून मोठ्याने ओरडताना मजा वाटत होती.आणि आम्हां मूठभर लोकांच्या घोषणांनी छत्तीसगड शासनाला काय ढेकळं धक्के बसणारेत,असाही विचार मनात येत होता.

आपल्या सगळ्यांमधे ही खूमखूमी असतेच.अन्यायाविरूद्ध आरडाओरडा करण्याची.पण कधी निषेध करून,कधी बोलून,संतापून,फार फार तर दोन शिव्या घालून आपण शासन व्यवस्थेविरूद्ध बोलतो.पण असं जाहिरपणे रस्त्यावर मोठ्याने ओरडून निषेध व्यक्त करण्याची संधी क्वचितच मिळते.आम्ही त्या संधीचं सोनं करत होतो.लोकशाही नावाची जकाही तरी व्हर्च्युअल गोष्ट असते असं एवढे दिवस वाटायचं.मोर्चा काढून निषेध व्यक्त करता येणं हा त्याच लोकशाहीचा भाग आहे हे आता कळत होतं! घोषणा देत असताना खोट्या सौजन्यशीलतेपलीकडे जाऊन आपण ओरडतोय हे लक्षात येत होतं.मोकळं वाटत होतं.
खरं तर मोर्चातल्या लोकांच्या संख्येपेक्षा निषेध महत्वाचा.

शिव्या घालून मोकळं होण्यापेक्षा दोन पावलं चालून,थोडे कष्ट करून लोकांपर्यंत हा निषेध पोहचवला पाहिजे. असं केलं नाही तर जे काही सुरू आहे ते आम्हांला मान्य आहे असचं वाटत राहणार. या सगळ्यात एक्साईटमेंट अर्थातच होती.मोर्चा आणि घोषणा रोमांचकारी असतातच.पण नायना म्हणतात त्याप्रमाणे यातून लर्निंग काय झालं तेही तपासून पाहायला हवं.

महत्वाचं म्हणजे या निमित्त्याने डॉ.बिनायक सेन आणि त्यांचं काम वाचण्यात आलं.1980 पासून छ्त्तीसगड मधे लोक स्वतंत्रता संघटना (PUCL) नागरी हक्कांसाठी काम करते.खासगीकरणामुळे विस्थापनाला विरोध असणारय्रा आदिवासींसाठी ही संस्था काम करते.जमीन हस्तगत करण्याच्या सरकारच्या धोरणाविरूद्ध आवाज उठवणाय्रा आदिवासींना नक्षलवादी ठरवून त्यांना छत्तीसगड स्पेशल पब्लिक सेक्युरिटी ऍक्ट (CSPSA) खाली अटक करण्याच्या विरोधात डॉ.सेन यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तुरूंगातल्या नक्षलवादी नेते नारायण संन्याल यांना भेटून त्यांना पत्र लिहीण्याच्या आरोपावरून छत्तीसफगड शासनाने बिनायक सेनांवर नक्षलवाद्यांचे साथीदार असल्याचा आरोप केला आणि त्यांना अटक केली. स्पेशल सेक्युरिटी अँक्ट खाली गेल्या 22 महिन्याँपासून डॉक्टर बिनायक सेनांना तुरूंगात डांबून ठेवलं आहे.

माओवाद्यांच्या विरोधात शांततामय मार्गाने ‘सलवा जुडूम’ मोहीम सुरू आहे म्हणत शासन स्वतः च्या आर्थिक लाभासाठी त्याचा उपयोग करून घेत आहे. सलवा जुडूम ची मोहीम आणि तिचा शासनातर्फे झालेला गैरवापर याविरोधात सेन यांनी आवाज ऊठवला होता. त्यांना स्थानिक आदिवासी लोकांचा पाठिंबा होता आणि अजूनही आहे.अनेक नोबेल पुरस्कार विजेत्यांसह वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी,सामाजिक संस्थांनी,व्रुत्तपत्रांनी डॉ.सेन यांच्या सुटकेची मागणी केली आहे.सर्वोच्च न्यालयालयानेही सलवा जुडूमला विरोध करून डॉ.सेन यांना नैतीक पाठिंबा दिला आहे.

या निमित्त्याने ‘ माओवाद ’ नेमका काय आहे,सलवा जुडूम मोहीम नेमकी काय आहे हेही वाचले.(Key Concepts in Politics: Andrew Heywood) फ्री बिनायक सेन कॅंपेन या त्यांच्या साईट वरूनही बरीच माहिती मिळाली. एखादा विषय कसा नीट पेटवता येतो हेही या निमित्त्याने लक्षात येत होतं.तिथल्या कार्यकर्त्यांच्या कामाची पद्धत लक्षपूर्वक पाहात होतो.मोर्चा,सत्याग्रह,जाहीर सभा,ग्रुहमंत्र्यांना पत्र या सगळ्या गोष्टी खूप पद्धतशीरपणे पार पाडल्या जात होत्या. मोर्चा नेण्यासाठी ताशा आणि माईक पासून ते दोन चार तगड्या आवाजाची माणसं आणि आकर्षक घोषणा देखिल लागतात हे कळालं.एवढे लोकं एकत्र जमतात आणि शिस्तीत काम करतात तेंव्हा त्यांची तयारी आणि कमिटमेंट खरच ग्रेट असणार हे जाणवत होतं. हा मोर्चा शेवटी निवारा व्रुद्धाश्रमाजवळ येऊन जाहीर सभेत विसर्जित झाला.

आपल्या निर्माण च्या मूलांना सुद्धा मोर्चा काढता यायला हवा हे डोक्यात घेऊनच आम्ही तिथून बाहेर पडलो.मोर्चा हा प्रकार आऊटडेटेड झाला असं वाटायचं.पण त्याच मोर्चाने खूप काही शिकवलं.

-सागर जोशी, 
पुणे. 

Thursday, December 8, 2011

जनसुनवाई


जनसुनवाई

गेल्या आठवड्यात नंदूरबार जिल्ह्यातल्या डनेल गावातलं रो.ह.यो.चं सोशल ऑडीट बघण्यासाठी मी आणि पीडी पुण्याहून निघालो होतो. पुण्याहून शहादा आणि तिथून पुढे धडगाव, मोलगी मार्गे डनेल. 
अक्कलकूवा तालूक्यातले डनेल गाव. मध्य प्रदेश आणि गुजरात ही तिन्ही राज्ये इथून अगदी जवळ. नर्मदा या गावाजवळून वाहात जाते. 
धडगाव ते डनेल जेमतेम तीस पस्तीस किलोमीटरचा रस्ता. पण इतका कच्चा की पोहचायला तब्बल अडीच तास लागणार होते. आदल्या रात्री पीडी पुढे गेला आणि मी योगीनीला मदत करण्यासाठी धडगावी थांबलो. रात्री उशीरापर्यंत काही कामे पूर्ण केली आणि पहाटे लवकर उठून डनेलला निघालो. 
रस्त्यात मोलगीला काही वेळ थांबावं लागलं. नर्मदा बचाव आंदोलनाच्या एका कार्यकर्त्याला जबर मारहाण झाली होती. डॉक्टर त्याच्यावर उपचार करायला तयार नव्हते. तो सगळा गुंता सोडवून मोलगीहून निघायला दहा वाजले.
सोशल ऑडीट साठी आलेले शासकीय अधिकारी, योगीनी आणि गीतांजली या नर्मदा आंदोलनाच्या कार्यकर्त्या, पोलिसांची एक जीप, मिडियाची मंडळी, सोशल ऑडीट म्हणजे काय हे पाहायला जालन्याहून आलेली नाटकातली कलाकार मंडळींची एक गाडी आणि आम्ही, अशा सहा गाड्यांची वरात निघाली. 
डनेल गावाला जाण्यासाठी या आधी रस्ताच नव्हता. सध्याचा रस्ता आहे तोसुद्धा दोन वर्षांपूर्वी झाला. पूर्वी सगळा प्रवास पायीच. रस्ता म्हणजे फक्त जेसीबीने करून ठेवलेला काय तेवढाच. डांबरीकरण नाही की खडी नाही. धक्के खात आजूबाजूचा सातपूडा पाहात आम्ही जात होतो. रस्ता संपला आणि डनेल गावात पोचलो तो पावसाला सुरूवात झाली. 
सोशल ऑडीटसाठी गावात पेंडॉल टाकले होते. लोकांची बसायची व्यवस्था केली होती. आणि हळूहळू गावातली लोकं जमू लागली होती. काही लोकं नदीपलीकडून बार्जमधून येणार होती. ती आली की ऑडीटला सुरवात होणार होती. रो.ह.यो.अंतर्गत या भागात रस्त्याची काही कामं झाली होती. पण त्यात बराच भ्रष्टाचार झाला होता. त्याचंच आज सोशल ऑडीट होणार होतं. 
रोजगार हमी योजना कायद्या अंतर्गत, गावात एखादं काम झालं असेल तर गावातल्या लोकांना झालेल्या कामाची तपासणी करण्याची मागणी करता येते. आतापर्यंत असं होतं की जर कामात घोटाळा किंवा भ्रष्टाचार झालाय अशी शंका आली तर गावातले लोक संबधित खात्यात तक्रार दाखल करू शकायचे. त्यानंतर पुढचा तपास आणि कारवाई करायचे सर्वाधिकार त्या संबंधित शासकिय अधिकार्‍यालाच असायचे. 
मात्र झालेल्या कामाच्या संबंधित कागदपत्रांची मागणी आता लोकांना शासनाकडे करता येते आणि शासनाला ती पुरवावी लागते. हे सर्व शासनाच्या संबंधित अधिकार्‍याच्या आणि लोकांच्या उपस्थितीत घडून येतं. म्हणून ही जनसुनवाई. सध्या हा अधिकार रो.ह.यो. पुरता मर्यादीत असला तरी लवकरच शासनाच्या सगळ्या कामांच्या बाबतीत अशी मागणी करता येणे शक्य होईल. 
बामणी, मोखाडा आणि चिमलखेडा अशा डनेल गावातील तीन ग्रामपंचायती मधे झालेल्या रोहयोच्या कामाचं हे सोशल ऑडीट होतं. 
डेप्युटी कलेक्टर ( रो.ह.यो.), त्या गावचा बीडीओ, डेप्युटी इंजीनीअर, ग्राम रोजगारसेवक आणि ज्यांच्या आशिर्वादाने हा भ्रष्टाचार झाला तो राजकीय पुढारी, या तीन गावांतील मजूर आणि नर्मदा बचाव आंदोलनाची मंडळी अशी सगळी फौज उपस्थित होती. 

मजूराचं नावं, त्याचे कामाचे दिवस आणि त्याला मिळालेली मजूरी मस्टरमधून वाचून प्रत्यक्ष लोकांकडून त्याची पडताळणी, असं ऑडीटचं स्वरूप होतं. 
मस्टर वाचनाला सुरूवात झाली आणि पहिल्याच स्टेटमेंटला ऑब्जेक्षन घेत योगीनी ताईने पद्धतशीरपणे एकेक पुरावा सादर करायला सुरूवात केली. काही लोकांची नावे भलत्याच गावात दाखवली होती. खोटी नावे, खोटी जॉब कार्ड्स असा सगळा प्रकार होता. 
शासनाची गोची अशी होती की झालेल्या कामाचा सगळा रीपोर्ट एन.आर.ई.जी. एस.च्या वेबसाईटवर टाकणं त्यांना बंधनकारक झालयं. त्यामूळे केंद्राकडून मिळालेली रक्कम आणि झालेल्या खर्चाची जुळवाजुळव करता करता त्यांची तारांबळ उडते. कारण बरीचशी कामे झालेलीच नसतात.
तपशीलवार रीपोर्ट बनवून वेबसाईटवर अपलोड करणे बंधनकारक असल्याने भ्रष्टाचार झालाय की नाही हे तपासणं आता आपल्याला फारच सोपं झालयं. अगदी एखाद्या मजूराचा जॉब कार्ड नंबर घेऊंन त्याचा दोन वर्षांचं रेकॉर्ड ट्रॅक करणेदेखिल शक्य आहे. पण त्या अडाणी मजूराला जिथे लिहितावाचताच येत नाही तो इंटरनेटवरून माहिती कशी काढणार..? 
म्हणूनच नर्मदा बचाव आंदोलनातल्या योगिनी आणि गितांजली ताई लोकांना हे सगळं समजून देत होत्या. कसं आणि काय बोलायचं, काय प्रश्न विचारायचे तेही सांगत होत्या. जनसुनवाईमधे लोकांनी बोलावं हीच अपेक्षा असते. 

मुद्दलात हा भ्रष्टाचार झालाय हे अगदी उघड गुपित होतं. सगळ्यांना ते माहितही होतं. पण ते सिद्ध करणं गरजेचं होतं. मग साक्षी पुरावे आणि सगळा गोंधळ सुरू झाला. 
इंटरनेटवरील माहिती आणि मस्टर यांचा ताळमेळ जुळेना. कारण सगळं मस्टरच चूकीचं होतं. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि डेप्युटी इंजीनिअरने गावात प्रत्यक्ष रस्ता न बांधता, तो बांधलाय असं दाखवून सगळा खर्च खिशात घातला होता. किती शांतपणे आणि पद्धतशीरपणे ही मंडळी भ्रष्टाचार करू शकतात ते आम्ही डोळ्यांसमोर पाहात होतो.
नुकतीच पेपर मधे या भ्रष्टाचाराबद्द्ल बातमी येऊन गेले होती. संबंधित व्यक्ती मयत असूनही दोन वर्षे तिला कामावर दाखवून मजूरी दिल्या गेली होती. ही बातमी पेपरमधे आल्यानंतर त्या मयताच्या विधवा बायकोचं अपहरण केलं गेलं. आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना खूनाच्या धमक्या आल्या. एकंदरच या भ्रष्टाचाराचा आवाका बराच मोठा होता. 
पाच दिवसांच्या बाळंतिनीला सहा दिवस काम केल्यावर या लोकांनी एक रूपयाचीसुद्धा मजूरी दिली नव्हती. अशा अनेक संतापजनक गोष्टी उघड होत होत्या आणि लोकांचा संयम सुटत होता. नियम वाकवून, मोडून - तोडून पैसा गडप केला होता.
शेवटी शेवटी तर लोकं भलतीच संतापली. भाषा समजत नसली तरी त्यांचा राग आणि संताप मात्र समजत होता. कितीही ठरवलं, तरी तटस्थ राहून ते सगळं पाहाणं शक्य होत नव्हतं. 
यथावकाश जनसुनवाई संपली. प्रोसिडिंग लिहून घेण्याच्या कामाला सुरूवात झाली आणि गावाहून आलेले मजूर लोक जेवायला बाहेर पडले. गावातल्या लोकांनीच जेवणाची व्यवस्था केली होती. आम्हीही तिथून उठलो आणि बाहेर पडलो. 
सातपूड्यातलं हे डनेल नावाचं छोटसं गाव. गाव कसलं, छोट्या छोट्या पाड्यांचा समूह. पिडी म्हणाला, या गावात जिथे रस्ताच पोहचत नव्हता तिथे शासनाच्या योजना कशा पोहचणार? हे कळत होतं पण पटत नव्हतं. शासनाच्या योजना पोचल्या नव्हत्या पण भ्रष्टाचार मात्र पोहचलेला दिसत होता. सगळंच अस्वस्थ करणारं होतं. 
आमच्याच वयाच्या रामसिंग नावाच्या गावातल्या एका तरूणाशी आम्ही बोलत होतो. जनसुनवाई सुरू असताना गावातली तरूण मंडळीसुद्धा बोलत होती, जनसुनवाईच्या परीणामांची कल्पना असूनही प्रश्न विचारत होती. डनेलमधलाच रणजीत वकिल झाला होता. तोही तावातावाने मूद्दे मांडत होता. गावात पुन्हा रोहयोची कामं होणं आता अवघड आहे हे माहित असूनही रामसिंग बोलत होता कारण ते सगळं सहन करून शांत बसणं त्यांना शक्यच नव्हतं. 
शासनाकडून रोहयोच्या अंमलबजावणीची अपेक्षा करण्यापेक्षा गावातच रोजगार निर्मिती करून या व्यवस्थेला पर्याय उभा करणं मलाही पटत होतं. पण त्या परिस्थीतीत विरोध करणं गरजेच होतं. 
डोकं भंजाळून टाकणारी ही परिस्थिती. नर्मदेवरचं ते धरण, त्यासाठी झालेलं आंदोलन सगळं डोळ्यापुढून सरकत होतं. नर्मदा बचाव आंदोलनाबद्दल ऐकून होतो. त्यामूळे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल खूपच उत्सुकता होती.


शासनाने निर्णय घ्यायचे आणि लोकांनी ते भोगायचे. मग ते धरण असो किंवा धान्यापासून मद्यनिर्मितीचा उद्योग. खरं तर त्या धरणाचे फायदे कोणाला, तर शहरातल्या लोकांना. जमीन पाणलोटाखाली आणून शेती वाढवणं हे खरं तर दूय्यम कारण. खरं कारण शहरांना पाणी आणि वीज मिळायला हवी. त्यापायी नर्मदेच्या खोर्‍यातल्या कित्येक गावांना नुकसान भोगावं लागलं. अजूनही त्याचे परिणाम ही लोकं भोगतचं आहेत.
लोकं आक्रमक का होतात, शस्त्र हातात का घेतात हे आता थोडं फार कळू शकत होतं. डनेल गावाचे सरपंच आणि उपसरपंच दोघही गैरहजर होते. कारण या भ्रष्टाचारात त्यांचेही हात बरबटलेले होते. गावातल्या लोकांना तोंड देणं त्यांना शक्य झालं नसतं. 
मला हे खूप महत्वाचं वाटलं. सध्या राज्यकर्त्यांना कुठलाच धाक उरला नाहीये. बी.डी.ओ. किंवा डेप्युटी इंजीनिअर जरी पुन्हा गावात येणार नसला किंवा त्यांचा गावाशी संबंध उरणार नसला तरी सरपंच मात्र गावातलाच होता. त्याला गावातच राहायचं होतं. त्याला असा धाक बसणं हे त्या जनसुनवाईचं खरं फळ होतं. 
एकीकडे जनसुनवाईतून असा संघर्ष करत राहाणं आणि दूसरीकडे रचनात्मक कामं उभी करणं दोन्ही महत्वाचं. मेधाताईंच्या प्रयत्नांनी उभ्या राहिलेल्या जीवनशाळेत शिकलेला रामसिंग आज तिथल्याच आश्रमशाळेत शिक्षक बनून लहान मूलांना शिकवतोय. गावातल्या भ्रष्टाचाराविरूद्ध बोलतोय. त्यालाही पुढे शिकायचयं पण दूर्गम भागामूळे पुढच्या शिक्षणासाठी अडचणी येताएत. 
त्याच्याशी गप्पा मारताना त्याच्या स्वप्नातलं त्याचं गाव कसं असावं हेही त्याने आम्हांला सांगितलं. या दूर्गम भागात काय करता येऊ शकेल जेणेकरून शासनावर अवलंबून राहावं लागणार नाही? याची चर्चा आम्ही करत होतो. या सगळ्यातून त्याने स्वतःच मार्ग काढायला हवा हे तर खरच आहे, पण त्याला राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली तर मार्ग नक्कीच सोपा होईल.
रामसिंगचं राहतं घर असलेला पाडा तिथून बराच दूर होता. त्याने तोही दाखवला. तिथे पोहचायला एक छोटी दरी ओलांडून जावं लागतं. त्या दरीवर मधला पूल न बांधता दोन्ही बांजूंना रस्ता बांधल्याचं या भ्रष्ट अधिकार्‍यांनी दाखवलं होतं. 
या निमित्त्याने रोजगार हमी योजना जवळून पाहायला मिळाली. जॉब कार्ड, फॉर्म चार आणि पाच अशा बाबी गडचिरोलीत काम करताना काही प्रमाणात समजल्या होत्या. या ऑडीटच्या निमीत्त्याने या सगळ्याची टेक्निकल बाबी,एन.आर.ई.जी.ए.ची वेबसाईट नीट पाहायला मिळत होती. योगीनी ताई स्वतः वकील असल्याने कायद्याच्या कचाट्यात या अधिकार्‍यांना कसं अडकवता येऊ शकतं तेही कळालं. 
पण केवळ शासनाशी भांडून भ्रष्टाचार बाहेर काढणं पुरेसं नाही. त्याचबरोबर जीवनशाळेसारखे उपक्रमसुद्धा राबवावे लागतात. कारण त्या गावातल्या लोकांना कामं मिळणं महत्वाचं. 
आम्ही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचयं म्हणून हे ऑडीट पाहायला गेलो नव्हतो. पण संघर्ष करण्यासाठी सोशल ऑडीट हे किती प्रभावी माध्यम ठरू शकत ते जाणवलं. वेगवेगळ्या ठिकाणी अशी कामं करणार्‍य़ा योगीनी आणि गीतांजली ताईसारख्या मंडळींना एकमेकांचा किती उपयोग होतो ते समजत होतं. अगदी युनिकोड सारखं सॉफ्टवेअर इंस्टॉल करून देणं सुद्धा किती मदत करून जातं..! 
आता रो.ह.यो. मधे पुढे काय करता येईल ते बघायचयं. 


- सागर जोशी, 

आनंदानुभव


                            आनंदानुभव

दहावीच्या सुट्ट्यांमधे मी आनंदवनाला गेलो होतो. असाच एकटा. नुकतीच दहावीची परीक्षा झालेली. साधना आमटेंच समिधा हे पुस्तक वाचनात आलं आणि मी त्यांना पत्र पाठवलं. तर प्रत्यक्ष साधनाताईंच पत्रोत्तर आलं. भेटायला आणि आनंदवन पाहायला ये म्हणून. तसाच निघालो. मनात आनंदवनाबद्दलच्या खूप सार्‍या कल्पना घेऊन.  
आनंदवनाच्या गेट मधून आत प्रवेश केला की उजव्या बाजूला काही अंतरावर एक मोठी ड्रेसिंग रूम आहे. तिथे कुष्ठरूग्णांच्या जखमांना रोज ड्रेसिंग केल्या जातं. तिथे जाऊन पोहचलो. त्या वेळी बायोलॉजीची आणि डॉक्टरी पेशाची मनस्वी चीड होती. ऑपरेशन सारख्या गोष्टी आपल्याला जमणार नाहीत असं उगाच वाटायचं. या सग़ळ्याबद्दल काहीशी भितीदेखील वाटायची. ड्रेसिंग रूम पाहिल्यावर ते सगळं आठवलं. ही भिती घालवायची तर ते सगळं करून बघणं भाग होतं. म्हणून मग ड्रेसिंग कसं करतात ते पाहायचं आणि जमलं तर प्रत्यक्षात स्वतः करून पाहायचं असं ठरवलं. दूसर्‍या दिवशी सकाळीच क्लिनिकला गेलो.
माझ्या आधी मोना नावाची एक वर्ध्याची मूलगी अनेक दिवसांपासून स्वतःहून तिथे ड्रेसिंगचं काम करायची. तिची सोबत होती. तिने थोडा धीर देखील दिला होता.

ती रूम बर्‍यापैकी मोठी. चार खाटा ठेवलेल्या. आणि बॅंडेजच सामान. 
आयोडीनचा वास.टिपिकल हॉस्पिटलच वातावरण.
बॅंडेज करायला चार जणं आणि गरज असल्यास इंजेक्शन द्यायला अजून एक. असे पाच जण मिळून आठ नऊशे लोकांचं बॅंडेज करायचे.
सकाळी 6 वाजता काम सुरू व्हायचं. सगळ्या पेशंटना बॅंडेज करून आपापल्या कामाला जायचं असायचं.म्हणून सकाळी तिथे कायम गर्दी आणि घाई असायची.
सगळ्यांनाच कामाला जायची लगबग.  
पहिल्या दिवशी सगळं फक्त पाहात होतो.आधिची पट्टी सोडणं, औषध लाऊन जखम धूवून त्यावर पट्टी लावणं. पिवळी आणि पांढरी असे पट्ट्यांचे दोन प्रकार. ज्यांची जखम अजून ओली असेल अशांसाठी पिवळी तर इतरांसाठी पांढरी पट्टी. अनेक जखमा. आणि त्यावर रोज केल्या जाणारं बॅंडेज. काम करायचं असेल तर चालणं आलचं. आणि त्यासाठी रोज पट्ट्या बदलणं देखील.
बहूतेक सगळी म्हातारी नाहीतर चाळीशी पार केलेली माणसं. बर्‍याच वर्षांपासून आनंदवनात असणारी. तिथेच काही ना काही काम करणारी.

पट्ट्या बांधणं वाटलं तेवढं सोपं नव्हतं. प्रत्येक पेशंटची पट्टी बांधायची विशीष्ट पद्धत असायची. वर्षानुवर्ष पट्टी बांधून तयार झालेली. झडलेल्या बोटांनुसार, ते जे काम करतात त्या कामाच्या स्वरूपानुसार ठरलेली. शेतात काम करणार्‍या म्हातार्‍या एक जादा पट्टी सोबत ठेवत. प्रत्येकजण आदल्या दिवशीची स्वतःची पट्टी सोबत घेऊन बसायचा.

पट्ट्या बांधून घेताना त्यांना कसल्या वेदना होत नसत. कारण कुष्ठरूग्णाला त्या भागात संवेदना नसतात. बंडेज गुंडाळताना, ती पांढरी पट्टी घट्ट आवळून बांधावी लागायची. आधी खूप सारा मेडिकेटेड कापूस पायाभोवती गुंडाळायचा आणि मग पट्टी बांधायची. अशी घट्ट बांधली की दिवसभर काम करताना ती निसटत नसे.
दूसर्‍या दिवशी मी पट्टी बांधायला घेतली. आदल्या दिवशी जखमा पाहून नजर मेली होती. नीट व्यवस्थित, जरा जास्तच वेळ घेऊन पहिली पट्टी बांधली.आपणही हे काम करू शकतो हा विश्वास आला.
     कधी कधी जखमेतून छोटे दगड, काचेचे तुकडे असं बरचं काही काढावं लागायचं. शेतात काम करताना पट्ट्यांमधून हे सगळं त्या जखमेत जाऊन बसायचं.   
मी नवीन आहे, अजून शिकतोय हे कळाल्यावर तिथल्या म्हातार्‍या पट्टी बांधताना धीर द्यायच्या. त्यांना पट्टी कशी बांधून हवी असेल ते स्वतःहून सांगायच्या. चूकलं तर ओरडायच्या. नीट जमल्यावर मनापासून शाबासकी द्यायच्या.
मी आणि मोना सोडून ड्रेसिंग करणारे बाकी सगळे कुष्ठरूग्णच होते. ट्रिटमेंट घेऊन बरे झालेले.

सकाळी 6 ते 9 प्रचंड काम. गडबड आणि धांदल. 9 नंतर मात्र म्हातारे कोतारे, कामाला न जाऊ शकणारे पेशंट यायचे. सगळं आवरायला 11 वाजायचे.
ती ड्रेसिंग रूम म्हणजे गडबड, गोंधळ आणि आनंदाचा नुसता कल्लोळ असायचा. ड्रेसिंग करणारं कुणी आलं नसेल तर त्याची चौकशी व्हायची. एकमेकांची थट्टा करत आणि हसतखेळत सगळं काम चालायचं.
रोज काम करून कामात सफाई येऊ लागली. 10-12 दिवस काम केल्यानंतर तर कुणाला कशी पट्टी लागते हे पाठच झालं होतं. पट्टी नीट जमली तर त्या प्रेमळ म्हातार्‍या खूपच कौतूक करायच्या..आशिर्वाद द्यायच्या.

सुरूवातीला वाटायचं, काय ह्या त्यांच्या वेदना..किती हा त्यांना त्रास..रोज पट्टी बदलायची. जखम झाली तर ती चिघळायची. मग काही दिवस काम बंद. असं बरच काही.
पुस्तकातून वाचून डोक्यात बसलेलं दुःख मी त्यांच्यात शोधायला जायचो. पण ही मंडळी तर भलतीच आनंदी असायची. कसलं दुःख आणि कसलं काय? जे झालयं ते मान्य करून जगायची.
प्रत्यक्षात दुःख होतं,वेदना देखील होती. पण या लोकांनी ती खूप सौम्य करून टाकली होती.
एकदा तर एक पेशंट आले होते. बरेच म्हातारे होते. त्यांच्या डाव्या पायाचा अर्धा अंगठा उंदराने रात्रीतून कुरतडून खाऊन टाकला होता.. संवेदना नसल्याने रात्री त्यांच्या लक्षात आलं नाही. सकाळी ऊठून पाहतात तर अंथरूणात सगळं रक्तं. त्यांचं ड्रेसिंग करताना खूप भरून येत होतं.

4-5 दिवसात बाबांच्या कानावर ही गोष्ट गेली की जालन्याहून आलेला मूलगा रोज ड्रेसिंग करतोय. त्यांनी मुद्दाम भेटायला बोलावलं. तोपर्यंत त्यांची भेट झालीच नव्हती. आनंदवनाचा सगळा परीसरच एवढा मोठा होता की तो पाहताना सगळा दिवस निघून जायचा. आणि त्यांना भेटायला जायचं दडपणचं यायचं. आपण काही काम करत नाही, तर पहिल्याच दिवशी जाऊन त्यांना कसं भेटायचं अशी काहीशी भावना मनात होती.
मग मी त्यांना भेटायला गेलो. खूप वेळ बोलत होते..काय बोलत होते ते आता फारसं आठवत नाही कारण मी खूप भारावून गेलो होतो. केवढा मोठा माणूस.. काही सुचतच नव्हतं त्या वेळेस.
बाबा त्यावेळेस रोज पहाटे स्ट्रेचरवरून फिरायला जायचे. मला म्हणाले,तूही रोज येत जा. तिथून पुढे आनंदवनात होतो तोपर्यंत मी रोज पहाटे त्यांच्यासोबत फिरायला जायचो. तो अर्धा पाऊन तास भलताच भन्नाट असायचा. पावसाळी वातावरण, पहाटेची वेळ आणि त्यात बाबांसोबत त्यांचं बोलणं ऐकत फिरणं. सगळच स्वप्नवत.

          विचारांपेक्षा कृती महत्वाची असते वगैरे भानगडी तेंव्हा कळायच्या
नाहीत. आपण काहीतरी करायला हवं एवढीच भावना होती. अजूनही तीच भावना आहे.
11 वाजता ड्रेसिंगचं काम झालं की जनरल वॉर्ड मधे चक्कर टाकून यायचो.तो तर सिरीअस पेशंट्सने भरलेला असायचा. सोबत पोळ काका असायचे. ते बर्‍याच वर्षांपासून तिथलं हॉस्पिटलचं काम पाहायचे. इथले पेशंट कंटेजिअस लेप्रसीचे असल्याने सगळी काळजी घेऊन तिथे जायचो.
इलाज सुरू असल्याने डॉक्टर आणि नर्स सोडून त्यांना फारसं कुणी भेटायला यायचं नाही.त्यामूळे आम्ही गेलो की तिथल्या पेशंटना खूप बरं वाटायचं.आम्ही येण्याची वाट बघायचे. त्यांची विचारपूस करायला, दोन शब्द बोलायला ना घरचे असायचे, ना कोणी जवळचे. आम्ही भेटल्यावर खूप भरभरून बोलायचे. स्वतःच दुःखं सांगायचे.   

कुष्ठरोगासारख्या भीषण रोगाशी लढणारी ही माणसं. आता आनंदी असली तरी खूप काही सोसलेली. कुष्ठरोगाचे निदान झाल्यावर घरच्यांनी आणि गावातल्या लोकांनी झिडकारलेली. त्यांची वेदना सारखी असल्याने सगळी एकमेकांना धरून राहायची, सांभाळायची.
      बाबा त्यांच्या झडलेल्या बोटांकडे पाहून त्यांना जीवंत मानवी शिल्प   म्हणतात. तेंव्हा त्याचा अर्थ कळायचा नाही, पण आता कळतो.
 आनंदवनात गेलो होतो तेंव्हा वैचारीक गुंत्यात फारसा पडलोच नव्हतो. आपण काहीतरी वेगळं करत आहोत असंही तेंव्हा वाटलं नव्हतं. सेवेचं सामर्थ्य मला बाबांच्या आनंदवनात शिकायला मिळालं. मला ते खूप भावलं. जवळचं वाटलं. त्या नकळत्या वयात तिथल्या कुष्ठरूग्णांशी मी जोडल्या गेलो.
 या अनुभवाने खूप काही दिलयं. शब्दांच्या पलीकडचं..




-          सागर जोशी,
   पुणे.